– विशाल धुमाळ
दौंड तालुक्यातील विधानसभा जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील धनगर समाजाची लोकसंख्या विचारात घेता आरक्षणाचा मुद्दा, औद्योगिक वसाहतीचे प्रदूषण, साखर कारखान्याचे प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न या विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
दौंड विधानसभा मतदार संघात महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार रमेश थोरात, वंचित आघाडीकडून तात्यासाहेब ताम्हाणे, शिवसेनेकडून महेश पासलकर, शरद सुर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून थोरात यांच्यासह आप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या पाच वर्षांत तालुक्यात खडकवासला कालव्यातून येणाऱ्या पाण्याची आवर्तनासह भीमापाटस कारखाना सुरू करण्यापर्यंतची कामे कुलांनी पार पडली तर अष्टविनायक रस्ता योजनांत तालुक्यातील रस्त्यांचा विकास, आरोग्य शिबिरं आदी विकासात्मक कामेही केल्याने आमदारा कुलांनी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजप सरकाने कोणतीही थेट भूमिका घेतली नसल्याने या समाजात भाजप विषयी काहीशी नाराजी आहे. त्याचा परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. यावेळीही दौंडची जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रासपकडेच गेली तर सर्वांनुमते राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर केली जाईल. तसेच, भाजपकरिता दौंडची जागा सुटली तर कुल यांना भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी लागणार आहे. धनगर समाजाची एकगट्ठा मते महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना मिळावीत, यासाठी तालुकाभर जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.