प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापुराचे संकट

– एन. आर. जगताप

तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा व चांबळी नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्‍यात हाहाकार पसरला. नदीकाठच्या गावांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणेने वेळीच नदीकाठी होणारी अतिक्रमणे रोखली असती तर अशा प्रकारे पुराचे संकट ओढवले नसते. नियमानुसार कोणत्याही नदीकाठी पूर नियंत्रण रेषेची आखणी केली जाणे आवश्‍यक असते. मात्र, तालुक्‍यातील कोणत्याही नदीकाठी पूरनियंत्रण रेषेची आखणी केली गेलेली नाही. यामुळे नदीकाठावर बेसुमार अतिक्रमणे वाढली आहेत.

काही ठिकाणी नदीने स्वतःचे पात्र बदलले व पाण्याचा लोंढा हा आजूबाजूच्या गावांमध्ये शिरला. त्यामुळे पुराने प्रचंड मोठे नुकसान झाले. मात्र, पुरामध्ये झालेले नुकसान हे अतिक्रमणांचे झाले असे म्हणून प्रशासकीय यंत्रणेने हात झटकणे चुकीचे ठरेल.

पुणे-पंढरपूर महामार्गावरील कऱ्हानदीवरील पुलाचे काम तब्बल दहा वर्षांपासून रखडलेले आहे. नवीन अर्धवट राहिलेल्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिक व प्रसार माध्यमांनी अनेक वेळा करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रितसर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे कानाडोळा केल्यामुळे पुरामुळे नदीवरील पूल तुटला. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. त्याचप्रमाणे सासवड शहरातील संगमेश्‍वर मंदिराजवळील जुन्या पुलाची कालमर्यादा तीन वर्षांपूर्वीच संपली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागानेच फलक लावून मान्य केले होते. मात्र, या पुलावरूनही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील जुन्या साकव पुलांची उंची वाढविण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या बाबीकडे कानाडोळा केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)