पाटण -पाटण तालुक्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण करोना बाधितांची संख्या 409 वर पोहोचली आहे.मंगळवारी आलेल्या बाधितांच्या अहवाल मुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.
पाटण तालुक्यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. उपचार घेत असणाऱ्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यापैकी 248 करोना बाधितांनी करोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज ऍक्टिव्ह 4 रूग्ण पाटण शहरातले असून यामुळे पाटण मध्ये निर्माण झालेली करोना बाधितांची साखळी तोडण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.
पाटण शहरात करोनामुळे 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे बुधवारी अँटीजेन टेस्टमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्ण हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. तर अन्य दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनाही पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय व 30 वर्षीय महिला, 10, 8, 4, वर्षाचे बालक, सुर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला, 18, 16, 56 वर्षीय पुरुष, पाटण मधील 47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला, वाजेगाव-मारूल येथील 72 वर्षीय महिला, पाटणमधील 70 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, मारुल हवेली येथील 50
35 वर्षीय महिला, 18 वर्षीय पुरुष, नाडे-नवरस्ता येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण मधील 68 वर्षे पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुष असे मंगळवारी आलेल्या अहवालानुसार बाधित यांची संख्या आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात एकूण बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा 409 पोहोचला आहे. त्यामुळे भिती व्यक्त होत आहे.
पाटण शहरात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. आतापर्यंत पाटणमध्ये करोनाचे 43 रुग्ण सापडले आहेत. तर हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बुधवारी तीन संशयितांना अँटीजेन टेस्टसाठी पाटण ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आणण्यात आले होते. मात्र, भितीपोटी त्या तिघांनीही तेथून पळ काढल्याने त्यांना शोधण्यासाठी सर्वांना धावाधाव करावी लागली.