कराड – गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात मृत पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यातील अनेक बाधित मृतांवर कराड येथील कोविड स्मशानभूमीत दहनविधी केला जात असल्याने स्मशानभूमीत ताण वाढत चालला आहे. मृतांवर तातडीने अंत्यसंस्कार होत नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवरही ताण वाढत चालला आहे.
याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था करावी. अन्यथा मलकापूर पालिकेने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्विकारावी, अशी मागणी नगरसेवकांमधून होऊ लागली आहे.
गत दहा ते पंधरा दिवसात जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यात मृत पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कराड येथे कृष्णा हॉस्पिटल, शारदा क्लिनिक व सह्याद्रि सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलमध्ये करोना बाधितांवर उपचार होत आहेत. फक्त कराड तालुक्यातीलच नव्हे तर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील रूग्णांनाही येथे दाखल केले जात आहे.
त्यामुळे या हॉस्पिटलमधील मृत पावणाऱ्या बाधितांवर कराड नगरपालिकेने उभारलेल्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. कराड पालिकेने या अंत्यसंस्कार विधीसाठी सात जणांची नियुक्ती केली आहे. गत चार ते पाच महिन्यांपासून आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी दहनविधी करत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून एका दिवसात तीन ते पाच मृतदेहांवर अंत्यविधी केला जात आहे. कराडच्या या कोविड स्मशानात एकच मृतदेह व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार होईल अशी जागा आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नाईलाजाने दोन ते तीन मृतदेह एकाच वेळी दाटीवाटीने अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. याबाबत नागरिक व नगसेवकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बुधवारी एकावेळी पाच मृतदेह अंत्यविधीसाठी आल्याने दोन मृतदेह बराचवेळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरा या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्वांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. मृतांची हेळसांड होत असल्याने पालिका प्रशासनाने तेथे पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांसह नगरसेवकांमधून होऊ लागली आहे.
पालिकेने याबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करून पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही स्वत: पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्मशानभूमी उभारू असा इशारा नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिला. नगरसेवक सुहास जगताप, फारूक पटवेकर, स्मिता हुलवाहन यांनीही या मागणीस आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
तर काहींनी कराड लगत असणाऱ्या मलकापूर नगरपालिकेनेही मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्विकारावी अशी मागणी केली. कराड पालिका कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कराड शहर येथे पर्यायी स्मशानभूमीसाठी मान्यता मिळाली नसल्याचे सांगितले. मात्र, मलकापूर येथे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विनंती करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र, नगरसेवक आपल्या निर्णयावर ठाम असून कराड शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी कराडमधील मृतदेहाची हेळसांड होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशारा देत पालिकेने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
83 मृतांवर अंत्यसंस्कार…
गत पाच ते सहा महिन्यांमध्ये कराड येथील कोविड स्मशानभूमीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील 83 मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
शहरात सात पेठामध्ये काम करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुकादमांसह आत्तापर्यंत विविध अडचणींना तोंड देत अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली आहे. सुरूवातीच्या काळात मृतांची संख्या कमी होती. मात्र, गत काही दिवसांमध्ये मृतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे.