नवी दिल्ली – मंगोलियाच्या विनंतीनुसार भारतातील गौतम बुद्धांचे पवित्र अवषेश तेथील नागरिकांच्या दर्शनासाठी नेले जाणार आहेत. मंगोलियात 14 जून रोजी बुद्ध दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या अवषेशांचे दर्शन करण्याचा लाभ येथील लोकांना मिळावा म्हणून भारताने हे अवषेश येथे पाठवावेत, अशी विनंती मंगोलियाच्या सरकारने केली होती.
त्यानुसार कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील 25 जणांचे भारतीय शिष्टमंडळ हे अवशेष घेऊन मंगोलियाला जाणार आहे. हे पवित्र अवशेष भारतीय वायुसेनेच्या C17 ग्लोबमास्टर विमानाद्वारे नेले जातील. ते तेथे 11 दिवस दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.
रिजीजू यांनी पत्रकारांना सांगितले की, राष्ट्रीय संग्रहालयातील हे अवशेष बाहेर नेले जात नाहीत; परंतु मंगोलियन सरकारच्या विशेष विनंतीवरून ते काही दिवसांकरीत तिकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे. गौतम बुद्धांचे हे पवित्र अवशेष बिहारमधील उत्त्खननात सापडले होते.