नवी दिल्ली- हल्ली छोट्या पडद्यावर अथवा अन्य माध्यमांवर विविध उत्पादनांच्या केल्या जाणाऱ्या जाहीरातींध्ये सेलेब्रिटी अर्थात तारे- तारका आणि खेळाडूंचा समावेश असतो. ज्या उत्पादनांशी त्यांचा संबंध आलेला नसतो अथवा ज्यांचा त्यांनी कधी वापरही केलेला नसतो अशा वस्तुंची ते जाहीरात करतात. मात्र या सेलेब्रिटींना आता असे करणे महागात पडण्याची शक्यता आहे. दिशाभूल करणाऱ्या अशा जाहीरातींमुळे त्यांना 50 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत नवे नियम जारी करताना सरकारने म्हटले आहे की, जर सेलेब्रिटींनी दिशाभूल करणारी अथवा स्वत: वापर केलेला नाही अशा उत्पादनाची जाहीरात केली तर त्या विशिष्ट उत्पादनाबाबत काही तक्रार आल्यास जाहीरात करणाऱ्या व्यक्तीलाही जबाबदार धरले जाईल.
खेळाडू असो वा सेलेब्रिटी यांनी येथून पुढच्या काळात अशा जाहीराती करताना पूर्ण सावधगिरी बाळगावी. तसेच ज्या वस्तूची ते जाहीरात करत आहेत, त्या वस्तूशी त्यांचा संबंध काय आणि कसा हेही त्यांना दाखवावे लागेल. जाहीरात करणाऱ्यांनी त्यांचे प्रामाणिक मत अथवा त्यांना संबंधित उत्पादनाचा आलेला अनुभव सांगणे अपेक्षित आहे, असे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांत म्हटले आहे.
जाहीरातदार ज्या उत्पादनाची जाहीरात करतो आहे, त्याच्याशी त्याचा संबंध काय आहे, याची माहिती त्याला द्यावी लागेल. तसे जर त्यांनी केले नाही तर ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे ते उल्लंघन मानले जाईल. अशा उल्लंघनासाठी सुरूवातीला 10 लाख व नंतर 50 लाख दंड केला जाईल. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहीराती रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.