लाहोर, दुबई – पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्या प्रकृती अस्वास्थ्यतेसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी थेट स्पष्टिकरण दिले असून आता मुशर्रफ यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर मुशर्रफ यांच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्यानंतर त्याच्या कुटुंबाने ट्विटरवर एक निवेदन जारी केले आणि मुशर्रफ व्हेंटिलेटरवर नाहीत, असे स्पष्ट केले.
मुशर्रफ गेल्या 3 आठवड्यांपासून रुग्णालयातच आहेत. त्यांच्या यकृतामध्ये पित्तरस साठून राहिला असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यात आता सुधारणा होणे शक्य नाही. आता त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत, अशी प्रार्थना करायला पाहिजे, असे या ट्विटर संदेशामध्ये म्हटले आहे.
अवास्तव प्रोटीन तयार होऊन त्यामुळे नियमित व्यवहारांमध्ये अडथळे येण्याच्या अवस्थेला “अमायलोयडोसिस’ म्हणतात. 2018 पासून मुशर्रफ यांना या आजाराने ग्रासले आहे.