जम्मू-काश्मीर – केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. किरेन रिजिजू हे शनिवारी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी रामबन जिल्ह्यात हा अपघात झाला. एका ट्रकने रिजिजू यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला झालेल्या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. रामबन पोलिसांनी सांगितले की, “केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या कारचा जम्मूहून श्रीनगरला जात असताना किरकोळ अपघात झाला. मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मंत्री किरेन रिजिजू यांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.”
VIDEO | Union Minister of Law and Justice @KirenRijiju‘s car met with a minor accident while going from Jammu to Srinagar earlier today. No one was injured in the accident. pic.twitter.com/bix6GaM7bX
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2023
या अपघातानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही सुरक्षा रक्षक कायदेमंत्री किरेन रिजिजू यांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये कार ट्रकच्या मागील बाजूस आदळल्याचे दिसत आहे. काही सुरक्षा कर्मचारी घटनास्थळाकडे धावताना दिसत आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेही सुरक्षेच्या गराड्यात दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू शनिवारी काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू विद्यापीठात डोगरी भाषेतील भारतीय संविधानाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशनच्या कार्यक्रमासाठी रिजिजू यांना आमंत्रित करण्यात आले होते.