पुणे – खाद्यतेलाने यंदा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरलेले भाव, परदेशातून जास्त होणारी आवक, तुलनेत देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कमी मागणीमुळे तेलांच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सर्वच तेलाच्या भावात सुमारे 40 ते 50 टक्के घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव तुलनेत स्थिर आहेत.
प्रामुख्याने मलेशिया, इंडोनेशिया येथून पामतेल, अर्जेंटिना आणि ब्राझील येथून सोयाबीन तेल, युक्रेन आणि रशियातून सूर्यफुलाच्या तेलाची आवक होत आहे. भारताला वर्षाला अंदाजे 250 लाख टन इतक्या खाद्यतेलाची गरज असते. त्यांपैकी 60 टक्के तेल हे परदेशांतून आयात करावे लागते. युक्रेन-रशिया युद्धामुळे सूर्यफूल तेलाचे भाव हे गगनाला भिडले होते. 15 किलो तेलाचा डबा हा 2,500 ते 2,600 रुपयांपर्यंत गेला होता. काळ्या समुद्रामार्गे तेल येत असते. तुर्कस्थानच्या मध्यस्थीने या तेलाची वाहतूक वाटाघाटीनंतर सुरू झाली. त्यामुळे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या सहा ते आठ महिन्यांत सूर्यफूल तेलाचे भाव 1,500 रुपयांवर आले आहेत.
तसेच मलेशिया, इंडोनेशियामध्ये पामतेलाचे उत्पादन वाढली आणि जागतिक बाजारपेठेत मागणी कमी झाल्यामुळे भावात घसरण होत आहे. देशात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचे दिवस असल्याने आणि त्यातच कमी भाव असल्यामुळे भारतातील आयातदारांनी जवळपास 35 ते 40 टक्के जास्त तेल दोन महिन्यांत आयात केले आहे. जरुरीपेक्षा जास्त तेलाची आयात झाली आहे. त्या तुलनेत देशातील बाजारपेठांमधून मागणी कमी आहे.
“गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलाचे भाव बऱ्यापैकी कमी झाले आहेत. हे भाव दिवाळीपर्यंत घटलेल्या स्थितीत टिकून राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव उतरल्याने भारतातदेखील तेलाच्या किमती उतरल्या आहेत. आवक जास्त आणि मागणी कमी यामुळे भाव घटलेल्या स्थितीत स्थिर आहेत.” – रायकुमार नहार, सचिव, दी पूना मर्चंट्स चेंबर आणि खाद्यतेलाचे व्यापारी
“गेल्या वर्षभरात जवळपास 40 ते 50 टक्क्यांनी तेलाच्या भावात घसरण झाली आहे. यामध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाचा प्रामुख्याने समावेश आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असले तरीही तेथून मोठ्या प्रमाणात माल येत आहे.” – राजेश लुंकड, खाद्यतेलाचे व्यापारी
तेलाच्या डब्याचे (15 कि.) भाव
तेलाचा प्रकारऑगस्ट 2022ऑगस्ट 2023
सूर्यफूल2,4001,500
सरकी2,3001,500
सोयाबीन2,3501,500
पामतेल2,1001,400
शेंगदाणा2,800 2,800