विश्रांतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मागील काळात पूर्णपणे प्रयत्न केला आहे. तर पुणे शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुढेही कटिबद्ध आहे. धानोरी व आजूबाजूच्या परिसराचा नगरसेविका रेखा टिंगरे यांनी अतिशय नियोजनबद्ध विकास साधला आहे. धानोरी मुख्य रस्त्याला जागा दिलेल्या प्रकल्पबाधित नागरिकांना लवकरच नुकसानभरपाई देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग १ मधील नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या मेडिटेशन सेंटर, अग्निशामक केंद्र, उद्यान, माजी सैनिक भवनचे उद्घाटन व लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. रेखा टिंगरे यांच्या कार्यअहवालाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार सुनील टिंगरे, नगरसेविका रेखा टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, पांडुरंग खेसे, कमल फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे, सुनील टिंगरे, माऊली टिंगरे, सतीश म्हस्के, शशिकांत टिंगरे, विनोद पवार, रेणुका चलवादी, अश्विनी सावंत-परेरा तसेच प्रभाग एकमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार बोलताना पुढे म्हणाले, की शहराचा विकास अधिक गतीने होण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो. राज्याच्या अर्थसंकल्पात वेगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, पुणे शहराच्या चारही दिशेला मेट्रोचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. याठिकाणी अग्निशमन केंद्राचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले आहे.
या केंद्राची धानोरीसह आजूबाजूच्या परिसराला मदत होणार असून सरकारी कार्यालयात देखील फायरचे ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील मी या भागात रेखाताई टिंगरे यांनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आलो होतो. त्यांच्या प्रयत्नातून उभारलेले प्रकल्प व विकासकामे दर्जेदार तसेच नियोजनबद्ध असतात. त्यांनी राजयोग मेडिटेशन केंद्र, माजी सैनिक भवन, उद्याने अशा विकासकामांचे पवार यांनी भरभरून कौतुक केले.
नगरसेविका रेखा टिंगरे म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे विश्रांतवाडी- धानोरीचा पाणीप्रश्नासह विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यांनी मला स्थायी समिती पद दिल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात आणखी विकासकामे केली जाणार असून दादांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासकामांची जबाबदारी माझी – अजित पवार
पुणे,पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची सत्ता असून त्यांना कोणी कारभारी नसल्याने कामे व्यवस्थित झाली नाहीत. त्यामुळे पुढील काळात आमच्या विचारांच्या लोकांना निवडून द्या, विकासकामे करण्याची जबाबदारी माझी राहील, असा शब्द अजित पवार यांनी दिला.