बारामती -पुणे ग्रामीण पोलीस दल अधिक कार्यक्षम होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे पोलीस दलाच्या स्वतःच्या जागेत पोलीस उपमुख्यालय निर्मितीकरिता राज्य शासनाच्या गृह विभागाने शासकीय मान्यता दिली आहे. बारामती तालुक्यात राजकीय शैक्षणिक औद्योगिक व इतर कारणांमुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असणारा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त इतर ठिकाणाहून मागावा लागतो.
जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचेपर्यंत विलंब होतो. काही घटना घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर परिणाम होतो. याकरिता बऱ्हाणपूर येथे पोलीस मुख्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी होता. पोलीस उप मुख्यालयासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे. हे क्षेत्र सीमा घोषित करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. आवश्यक पदनिर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.
बारामती उपविभाग अंतर्गत 19 पोलीस स्टेशन आहेत. अधिकच्या बंदोबस्तासाठी या उपमुख्यालयाचा फायदा होणार आहे. 300 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची सोय करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत होणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कामकाज उपमुख्यालयातून चालणार आहे. ऑफिशियल ट्रेनिंग सेंटरची निर्मिती होणार आहे.
गोळीबार सराव केंद्र, परेड ग्राउंड, हेलिपॅड बनणार आहे. कॅन्टीन, मल्टीपर्पज हॉल, विश्रांतीगृह बांधण्यात येणार आहे. बारामती उपविभागामध्ये पोलीस उपमुख्यालयाची आवश्यकता होती. कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टिकोनातून हे उपमुख्यालय महत्त्वाचे आहे.
– नारायण शिरगावकर, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी.