पोलिसांचे आरोग्य जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश
पुणे – करोनाची साथ संपवण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमित कारवाई झालीच पाहिजे. नियमांचे काटेकोर पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील करोनाच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत करोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करावी. करोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घ्यावी. बैठकीच्या सुरुवातीस विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय करोनाबाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील याची माहिती दिली.
बेड्ची कमतरता भासणार नाही
करोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था असणारी कोविड रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. दोन्ही शहरांत करोनाग्रस्तांना उपचारांसाठी बेड्सची कमतरता भासणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात केला. महापालिकेकडून बाणेर येथे “सीएसआर’ तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यावेळी उपस्थित होते.