आमदार अशोक पवार यांना नागरिकांचा गराडा ः विविध दाखल्यांचे वाटप
वाघोली -लोकाभिमुख प्रशासनासाठी वाघोली येथे सोमवारी (दि. 3) आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात महसूल, पुरवठा विभाग, महावितरण, पंचायत समिती, पीएमआरडीए संदर्भातील तक्रारींचा पाढा नागरिकांनी आमदार अशोक पवार व अधिकाऱ्यांसमोर वाचला.
तसेच तक्रारी व भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी आमदार अशोक पवार यांना वाघोली-आव्हाळवाडी, पेरणे-वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी अक्षरशः गराडा घातला. यावेळी विविध योजनेतील काही लाभार्थींना शिधापत्रिका, दाखले, सर्टिफिकीट व धनादेशाचे वाटप करण्यात आले.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाघोली येथील श्रेयस मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांसाठी प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटनावेळी आमदार पवार यांनी शासनाच्या प्रत्येक विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची ओळख नागरिकांना करून दिली. याप्रसंगी हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली तहसीलदार सुनील कोळी, नायब तहसीलदार संजय भोसले, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व ग्रामस्थ उपस्थित होते.