IPL Live Cricket Score, RCB vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा सहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. आरसीबीची नजर त्यांच्या पहिल्या विजयावर असेल तर पंजाबचे लीगमध्ये दुसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य असेल.
आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीतील सहावा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या मोठ्या विक्रमावर नजर असेल. त्याचबरोबर दिनेश कार्तिकही एक विशेष कामगिरी आपल्या नावावर करू शकतो. हा सामना दोन्ही संघांसाठी खास ठरू शकतो.
‘या’ विक्रमावर असेल विराट कोहलीची नजर…
आजच्या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली 650 चौकार पूर्ण करू शकतो. हे करण्यासाठी त्याला सात चौकारांची गरज आहे. या धडाकेबाज फलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 238 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सात शतके आणि 50 अर्धशतकांच्या मदतीने 7284 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात किंग कोहलीने चेन्नईविरुद्ध एका षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या होत्या. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला होता.
धवन-कार्तिकही करू शकतात नवा विक्रम…
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 150 षटकार पूर्ण करू शकतो. हे करण्यासाठी त्यांना दोन हवाई फायरची(दोन षटकार) आवश्यकता आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता धवन आज या विक्रमाला स्पर्श करू शकतो असे दिसते. त्याचबरोबर दिनेश कार्तिकही 150 षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्यासाठी त्याला सात षटकार लागतील. गेल्या सामन्यात आरसीबीच्या स्टार फिनिशरने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या होत्या. सीएसकेविरुद्ध तो नाबाद राहिला.
दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड…
दरम्यान, आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत तर पंजाबने 17 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, बेंगळुरूमध्ये दोन्ही संघांमध्ये 11 सामने झाले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने सहा आणि पंजाबने पाच जिंकले आहेत. एकूण आकडेवारी पाहिल्यास आरसीबीविरुद्ध पंजाबचा वरचष्मा आहे. तर घरच्या मैदानावर आरसीबीने पंजाबविरुद्ध अधिक वेळा विजयाची चव चाखली आहे.