IPL 2024 (#KKRvsSRH Match 3) Harshit Rana’s ‘flying kiss’ : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान केकेआरचा गोलंदाज हर्षित राणाने सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाइंग किस देत निरोप दिला. हे कृत्य त्याला महागात पडले. हर्षित राणा शनिवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा हिरो ठरला असेल, पण त्याच्या वाईट वागणुकीमुळे बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे.
मयंक त्याच्या या कृतीने खूप चिडलेला दिसत होता. एकीकडे चाहते हर्षितच्या गोलंदाजीचे कौतुक करत होते, तर दुसरीकडे वरिष्ठ खेळाडूंचा आदर करण्याचे ज्ञानही देत होते. आता बीसीसीआयने त्याच्या या कृतीवर कारवाई करत हर्षितला मॅच फीचा दंड ठोठावला आहे.
वास्तविक, मयंक आणि अभिषेक हैदराबादसाठी सलामीला आले होते. यादरम्यान दोघांनीही जोरदार फलंदाजी सुरू केली. केकेआरचे गोलंदाज खूप दडपणाखाली असल्याचे दिसत होते. दरम्यान, हर्षित राणाने केकेआरसाठी सहावे षटक आणले. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मयंकला बाद केले. मयंक 21 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मयंक बाद झाल्यानंतर हर्षितने त्याला फ्लाइंग किस दिला. अन् हीच कृती हर्षितला महागात पडली.
Sunil Gavaskar ” Harshit Rana should not have given that send off to mayank. Did the Mayank Agarwal do anything to him when he was hitting him for sixes? Celebrate with your teammates but no need for such antics for the opposition”pic.twitter.com/UfoNfENNG6
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) March 24, 2024
बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणाला 23 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या एकूण 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.’
प्रसिद्धीपत्रकानुसार राणाने एकदा नव्हे तर दोनदा आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी 10 टक्के तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. मयंक अग्रवालनंतर त्याने शेवटच्या षटकात हेनरिक क्लासेनविरूध्दही असेच कृत्य केल्याचे समजते.
प्रसिद्धीपत्रकात पुढे लिहिले आहे की, ‘राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चे दोन गुन्हे केले आहेत. दोन संबंधित गुन्ह्यांसाठी त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के आणि 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. राणाने दोन गुन्ह्यांची कबुली दिली आणि मॅच रेफरीची शिक्षा मान्य केली. आचारसंहितेच्या स्तर 1 भंगासाठी, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.’