पाथर्डी – रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ग्रामस्थांनी पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले. पाथर्डी तालुक्यातील पत्र्याचातांडा या ठिकाणाहून रेशन दुकानदाराकडून संगनमताने रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला (एम 20 डीई 5261) संशयितरित्या गावात फिरताना काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर टेम्पोतील गोण्यात काय आहे, असा संशय बळावल्याने ग्रामस्थांनी टेम्पो चालकाला अडवले.
त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला व पुरुष ग्रामस्थ गाडीला आडवे झाले. त्यानंतर चावी काढून घेत महसूल प्रशासनाला याची माहिती फोनद्वारे दिली. त्यानंतर महसूल विभागाच्या पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर यांनी तो टेम्पो ताब्यात घेतला आहे. पुरवठा अधिकारी अकोलकर यांनी पत्राचा तांडा या ठिकाणी जाऊन गाडीचा पंचनामा केला.
गाडी मालक अशोक वा. कळकुंबे (रा.अमरापूर ता.शेवगाव)यांनी या परिसरातील काही लोकांकडून व पत्राचातांडा येथील स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदार गणपत राधू पवार यांचे दुकानातून तांदूळ व गहू विकत घेतला.
गाडी चालकाने गाडीत प्लास्टिकच्या 22 गोण्यामध्ये भरलेला आहे. या गोण्यांचे अंदाजे वजन एक गोणी 50 किलो आहे. कळकुंबे याचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे. रोहिदास कान्हू पवार, परमेश्वर उत्तम चव्हाण, झुंबर धनसिंग पवार, चंद्रकांत सोमा जाधव, विशाल नवनाथ चव्हाण, सुनील चव्हाण, संतोष चव्हाण आदी ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.