पाथर्डी , (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अतिशय प्रगतीचा आलेख वाढवणारा असून अवघ्या नऊ महिन्यांत एक कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न वाढून एक कोटी दहा लाख रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या आहे.अधिक क्षमतेचा बसवलेला भुईकाटा यातून व्यापाराची वृद्धी होऊन नव्याने कांदा मार्केट आता सुरू होणार आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन पाथर्डी शहराबरोबर तालुक्याच्या बाजारपेठला आर्थिक सुबत्ता येणार असल्याचे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पन्नास टनी भुईकोट काट्याचे लोकार्पण व कांदा मार्केट बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, रामकिसन काकडे,
बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, माणिक खेडकर, संजय बडे, बजरंग घोडके, बंडु बोरुडे, रामकिसन शिरसाट, अमोल गर्जे, बंडू पठाडे, विष्णुपंत अकोलकर, शुभम गाडे, धनंजय बडे, नितीन गर्जे,अंकुश चितळे, मुकुंद गर्जे, चारुदत्त वाघ, मुकुंद लोहिया, मंगल कोकाटे यांच्यासह सर्व संचालक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.राजळे म्हणाल्या,नऊ महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता परिवर्तन झाल्यानंतर चांगल्या प्रकारे प्रगतीचा झेप घेऊन विकास कामे सुरू आहे. बाजार समितीचे खरवंडी, भालगाव या ठिकाणी मोठे भूखंड आहे. ज्या त्या भागातील भूखंडावर तेथील शेतकरी, व्यापारी यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टीने ते भूखंड विकसित केले जातील.
बाजार समिती म्हणजे भूखंड किंवा गाळे विक्री पुरता विषय मर्यादित न राहता येथील खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी शेतकरी, व्यापारी यांच्या हिताचे चांगले प्रकारचे निर्णय घेण्यास सुरुवात केली .
पाथर्डीच्या बाजार समितीबरोबर इतरही तालुक्यातील उपबाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्या ठिकाणीही समितीचे उत्पन्न वाढवण्याचे काम झाले आहे.
अशीच कामाची प्रगती आणि भरभराट सुरू राहिली तर येणाऱ्या काळात चांगला मोठा प्रकल्प बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांचे हितासाठी नक्की भविष्यात घेतला जाईल. मान्यवरांचे स्वागत बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे, प्रास्तविक सुभाष बर्डे तर सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करून आभार पांडुरंग लाड यांनी मानले.
विखे, मुंडेंच्या उमेदवारीचे स्वागत
माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. मोनिका राजळे समवेत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता विखे यांचा प्रचार करून त्याबरोबर पंकजा मुंडे यांचा प्रचारासाठी बीड जिल्ह्यात आपल्याला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजळे यांनी केले.