पालघर – पालघरमध्ये एका 19 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला जव्हार तालुक्यातील एका गावातील असून दोन जणांनी रविवारी तिला शेतातील धान्य गोदामात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची वाच्चता कुठे करुन नये यासाठी तिला धमकावले.
कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारु असे महिलेला सांगितले. आरोपींच्या धमकीमुळे महिला खूप घाबरली. तिने याबाबत कुटुंबियांनाही काही सांगितले नाही. मात्र या घटनेनंतर तिचे बदललेले वागणे पाहून कुटुंबियांना संशय आला. त्यानंतर घरच्यांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडला प्रकार कथन केला. त्यानंतर महिलेच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध सुरु असून लवकरात आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.