पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षे सक्तमजुरी व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी सुनावली.
सुखदेव सिद्धराम बनसोडे (रा. अप्पर इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अल्पवयीन पीडितेच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २२ जून २०१९ रोजी घडली. त्या दिवशी पीडितेचे पालक कामावर गेले होते. तर, भाऊ घराबाहेर खेळत होता. त्यावेळी आरोपी सुखदेव बनसोडे याने घरी येऊन पीडितेवर बलात्कार केला.
तसेच, आरडाओरडा केल्यास आई व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. सायंकाळी पीडिता घाबरलेली असल्याने आईने तिला विश्वासात घेतले. त्यावेळी भीतीमुळे आरोपी बनसोडे याने विनयभंग केल्याचे पीडितेने आईला सांगितले. त्यामुळे आईने कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर आरोपीने अत्याचार केल्याचे तिने सांगितले.
कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अंकुश केंगले आणि महेश जगताप यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
दंडाची रक्कम पीडितेला
विशेष न्यायालयाने आरोपीला विविध कलमांखाली साठ हजार रुपये दंडही ठोठावला. या दंडाची रक्कम पीडितेला भरपाई स्वरुपात देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त दोन वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.