नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी (20 डिसेंबर) गुन्हेगारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके मंजूर करण्यात आली. या तिन्ही विधेयकांवर चर्चेदरम्यान जोरदार चर्चा झाली. एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही विधेयकावरील चर्चेदरम्यान काही पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. बलात्कार फक्त महिलांवरच होतो का? पुरुषांवर बलात्कार होत नाही का? असे परखड सवाल त्यांनी लोकसभेत उपस्थित केले. ओवैसींच्या वक्तव्यानंतर काही सदस्यांना हसू आवरणं अवघड झाले होते.
नेमकं काय म्हणाले ओवैसी?
विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “बलात्कार फक्त महिलांवरच होतो का? पुरुषांवर बलात्कार होत नाही का? पुरूषांचा पाठलाग केला जात नाही का? विधेयकात याबाबत कोणतीही तरतूद नाही.” ओवैसी यांनी हे सांगताच काही सदस्य हसू लागले. यावर ओवैसी म्हणाले की, “तुम्ही हसत आहात, पण तुम्हाला माहीत नसेल, पण असं घडतंय, असं घडू शकतं. तुमचं हसणं म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, असं कोणासोबत तरी झालं.”
ओवैसी पुढे म्हणाले की, “कलम 69 मध्ये लव्ह जिहादचा उल्लेख आहे. तुम्ही ते सिद्ध करू शकणार नाही. यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की, ओळख लपवून संबंध निर्माण केले गेले आहेत. म्हणजे, जर एखादी स्त्री मोनू मानेसर किंवा चोमू चंदिगडच्या प्रेमात असेल. नंतर तो चंदीगड किंवा मानेसरचा नाही हे कळालं तर कलम 69 लागू होईल का?”
“जर एखाद्याचं नाव मुस्लिमांच्या नावांसारखं सामान्य असेल तर हे कलम लागू होईल का? तुम्ही व्यभिचार आणि समलैंगिकता दूर केली आहे. यामध्ये सहमतीनं संबंध ठेवण्याचा अधिकार रद्द करण्यात आला आहे. मी धार्मिकदृष्ट्या याच्या विरोधात असूनही तुम्ही हा अधिकार का काढून घेतला? राजद्रोह हा शब्द वापरला नसला तरी देखील, तो पुन्हा आणला गेला आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात हमीपत्र दाखल करुन सांगितलं होतं की, ही तरतूद आणणार नाही.”