नागपूर: उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. आशा आहे या बलात्कारी भाजप आमदाराला कठोर शिक्षा न्यायालयाच्या माध्यमातून सुनावण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले, भाजपा आपल्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सर्व खटल्यांची सुनावणी उत्तर प्रदेशाबाहेर म्हणजे दिल्लीत हलवली होती आणि म्हणून कुलदीप सिंग सेंगरला दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे भाजपच्या इतरही नेत्यांवर बलात्काराचे खटले इतर राज्यांमध्ये चालवण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली कोर्टाने सोमवारी निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना बलात्कार आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवले. तिस हजारी कोर्टाने 10 डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. सेंगर आणि त्याच्या साथीदारांना भाजपमधून काढून टाकण्यात आले. यांनी 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.