एमपीसीबी अधिकारी, मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले
पिंपरी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वीस लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यास एक लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपींमध्ये महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या रिजनल ऑफिसरचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 21) रात्री कल्याणीनगर येथील हॉटेल हयात येथे उघडकीस आला.
कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वाकडेवाडी येथील रिजनल ऑफिसर डॉ. जितेंद्र संघेवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी कपिल सुभाष पाटील (वय 42, रा. लोढा बेलमांडो, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसी येथील ‘स्टार इंजिनिअर्स इंडिया प्रा. ली. या कंपनीत नोकरीला आहेत. आरोपी आशिष अरबाळे हा देखील त्याच कंपनीत कन्सल्टंट म्हणून कामाला आहेत. त्याने कंपनीची गोपनीय माहिती आरोपी आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली.
या माहितीच्या आधारे मनसेचा पदाधिकारी कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे कंपनीच्या विरोधात प्रदूषण होत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून पाटील यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.
पाटील यांनी याबाबत थेट पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी आणि चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक तयार करून ऍक्शन प्लॅन तयार केला. या प्लॅननुसार आरोपींना टोकन म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये नरके पैसे स्वीकारण्यासाठी आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले.