शरद पवार आणि सचिनची उपस्थिती
पुणे – महाराष्ट्राच्या क्रिकेट वर्तुळात आणखी एका मैदानाची भर पडणार आहे. राज्याच्या राजकारणाचे प्रमुख ठिकाण असलेल्या बारामतीत नवे मैदान सज्ज झाले असून लवकरत येथे प्रथमच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची लढत रंगणार आहे.
बारामतीत नव्याने तयार झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत हा पहिलावहिला रणजी सामना होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे दिग्गज खेळाडू या सामन्याला उपस्थित राहणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येथील मैदानाला प्रथम दर्जाचे मैदान म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतरचा हा पहिलाच सामना ठरणार आहे.
टी-20 सामना रंगला होता
या मैदानावर मुंबई आणि महाराष्ट्र या दोन संघांमध्ये याआधी टी-20 सामना रंगला होता. त्यावेळीच या मैदानाची उपलब्धता लक्षात आली होती व त्यामुळेच बीसीसीआयचे येथे रणजी सामने आयोजित करण्यास मान्य दिली.