Ram Mandir: अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 500 वर्षानंतर भगवान श्री राम त्यांच्या भव्य आणि दिव्य राम मंदिरात विराजमान झाले होते. मोठ्या लढ्यानंतर रामाचे मंदिर अयोध्येत स्थापन झाल्यानंतर अनेकांना आनंद अश्रु अनावर झाला. यातच आता अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी सुरतमधील एका हिरे व्यावसायिकाने 11 कोटी रुपयांचा मुकुट दान केला आहे.
कोण आहे मुकेश पटेल?
सुरतचे भेट ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे प्रसिद्ध ज्वेलर मुकेश पटेल हिरे व्यापारी स्वत: कुटुंबासह अयोध्या धाम राम मंदिरात मुकुट दान करण्यासाठी पोहोचले होते. मुकेश पटेल यांनी सोने, हिरे आणि नीलमांनी जडलेला ६ किलो वजनाचा मुकुट तयार केला आहे. मुकुटाच्या वरील भागात कमळाचे बारीक कोरीवकाम आहे, परंपरेक मंदिर वास्तुकला, रामाचे राज्य व देवत्व या तिन्ही पैलूंचे प्रतिक असा हा मुकुट साकारण्यात आला आहे.
कसे घडवले मुकूट?
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नवदिया यांनी पटेल यांना राम मूर्तीसाठी अलंकार घडवण्यास सुचवले होते आणि त्यांच्या या विनंतीने भारावून गेलेल्या पटेल व कुटुंबांनी लगेच होकार देऊन या अद्वितीय अलंकाराची जडणघडण करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन कुशल कारागिरांना मूर्तीचे मस्तक अचूक मोजण्यासाठी अयोध्येला नेण्यात आले होते. वेगवेगळ्या आकाराचे हिरे, रंगीत माणिके, मोती, नीलम सारखी अनेक सुंदर रत्ने जडवण्यात आली आहे. 11 कोटी किंमतीचा 6 किलो वजनाचा हा सुंदर मुकूट असून यात 4 किलो सोने वापरण्यात आले आहे.