जयपूर : कोरोनाची दुसरी लाट थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेने दरवाजावर ठोठावलं आहे. राजस्थानमधील दौसा येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तिसऱ्या लाटेच्या शक्यतामुळे दौसा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
ही मुलं 0 ते 18 वर्ष वयोगटातील आहेत. दौसा जिल्ह्यात 1 मे ते 21 मे या काळात 341 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली. सुदैवाने यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं पाहता दौसा जिल्हा प्रशासन दक्ष आहे.
दरम्यान राजस्थानमधील ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आता युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाची टीम गावोगावी आणि घरोघरी फिरुन लोकांची कोविड टेस्ट करत आहे. गावातच कोव्हिड सेंटर बांधले जातील आणि कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू केले जातील. डोअर-टू-डोअर सर्वेक्षण अभियान सुरू झाले आहे.
तिसरी लाट येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांतील मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असू शकते.
तिसऱ्या लाटेत लहान मुलं मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, आता दौसामध्ये 341 मुले कोरोनाग्रस्त आढळल्याने अडचणीत भर पडली आहे. 15 दिवसांच्या काळात 19 हजार मुलांना संसर्ग झाला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार बहुतेक मुलांना सामान्यत: सौम्य ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यात अडचण, अतिसार, अन्नाची चव नसणे, गंध घेण्याची क्षमता कमी होणे, थकवा, घसा खवखवणे, स्नायूदुखी, नाक वाहणे अशा लक्षणांचा समावेश आहे.