7th Pay Commission । रंगांचा सण होळी आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्याने आनंदाच्या बातम्या येत आहेत. देशातील विविध राज्यात महागाई भत्ता वाढवण्यात येत आहेत. या यादीत आता राजस्थानचा समावेश झाला आहे.
4 टक्के वाढ 7th Pay Commission ।
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारने गुरुवारी एक दिवस आधी महागाई भत्त्यात नवीनतम वाढ जाहीर केली. नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारने राजस्थान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४-४ टक्के वाढ जाहीर केलीय. या घोषणेनंतर आता राजस्थान सरकारच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना जास्त पगाराचा लाभ मिळणार आहे. माजी कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
12 लाखांहून अधिक लोकांना लाभ
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर शर्मा म्हणाले की, केंद्र सरकारच्या धर्तीवर राजस्थान सरकारनेही डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 8 लाख कर्मचारी आणि 4.40 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ते म्हणाले की, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या खर्चात सुमारे 1,640 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.
१ जानेवारीपासून लाभ मिळणार 7th Pay Commission ।
यापूर्वी राजस्थान सरकारी कर्मचाऱ्यांना ४६ टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ मिळत होता. ताज्या वाढीनंतर महागाई भत्ता आता ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पेन्शनधारकांना कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई सवलतीचा लाभ मिळतो. महागाई सवलतीचा दर देखील सामान्यतः महागाई भत्त्याइतकाच असतो. राजस्थान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
डिझेल आणि पेट्रोलवरील करही कमी
याशिवाय राजस्थान सरकारने राज्यातील जनतेला आणखी एक भेट दिली आहे. राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. व्हॅट कमी करण्याच्या मागणीसाठी अलीकडेच राज्यातील पेट्रोल पंपचालक संपावर गेले होते. राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट 2 टक्क्यांनी कमी केला आहे. केंद्र सरकारनेही गुरुवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 2-2 रुपयांनी कपात केली आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये केलेली कपात आणि केंद्र सरकारने केलेली कपात या दोन्हींचे फायदे आजपासून मिळणार आहेत.