रायगड – रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये रविवारी जागर यात्रा काढण्यात आली. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले होते. या रस्त्यावर अडीच हजार माणसे गेली आहेत. नवीन टेंडर काढायचे पैसे खायचे हेच वर्षानुवर्षे सुरु आहे अशी टीका यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्याने चालू शकलो नसल्याचे देखील राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
सतरा वर्ष झाली हा रास्ता का होत नाही याच उत्तर सोपं आहे कारण तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही काही पाहत नाही केवळ भावनिक होऊन मतदान करतो परंतु इतकी वर्ष काय भोगत आहोत याचा विचार करत नाही असं स्पष्ट मत यावेळी राज ठाकरेंनी मांडलं.
हा रस्ता असाच ठेवण्याचं कारण म्हणजे या रस्त्याभोवतीच्या अनेक जमिनी काहीजण विकत घेताहेत जेणेकरून रस्ता झाल्यावर जमिनीच्या किमती वाढतील.आज ना उद्या रस्ता होईल तेव्हा जमिनीच्या किमती तुमच्याच पिढ्यांना मिळतील म्हणून आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन देखील यावेळी राज ठाकरेंनी कोकणी बांधवांना केले.
या रस्त्यासाठी मनसे सैनिकांनी आंदोलन केले तर माझ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये एक दिवसांची पोलीस कोठडी दिली. यावेळी माझ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवरती बसवले. मला त्यांना एवढच सांगायचंय,सरकार आजच असो किंवा कालच असो,सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो. अंडरवेअरच रिटन गिफ्ट मी देखील देऊ शकतो असा इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला.