औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंच्या गाडीच्या मागील तीन गाड्या ऐकमेकांना धडकल्या आहेत. या अपघातामध्ये अभिनेते केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्या गाड्या ऐकमेकांना धडकून बोनटचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. त्यासाठी राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह पुण्यातून औरंगाबादच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. अहमदनगर जवळील घोडेगाव येथे हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झाला असून पुढील काही वेळात ते पोहोचणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांचे प्रवासादरम्यान विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.