धरणाचे दरवाजे साडेचार फुटांवर
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात शुक्रवार सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. त्यामुळे धरणाचे आठ फुटांवर असणारे दरवाजे साडेचार फुटांवर करण्यात आलेले आहेत. सध्या धरणात 61 हजार 576 कयूसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या दरवाजामधून 41 हजार 514 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सायंकाळपासून पावसाने कमी-जास्त प्रमाणात विश्रांती घेतली आहे. कोयना पाणलोट क्षेत्राच्या महाबळेश्वर, नवजा, कोयना याठिकाणी पडणारा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. सध्या धरणात 61 हजार 576 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात पाण्याची आवश्यकता नसल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या धरणातून 41 हजार 514 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत असल्याने कोयना नदीकाठी असणाऱ्या गावांचा धोका टळला आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली असणारे मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे नदीपलीकडील गावांना पाटणच्या बाजारपेठेशी संपर्क करणे शक्य झाले आहे. दरम्यान गेल्या बारा तासात कोयनानगर याठिकाणी 173 मिलिमीटर नवजा येथे 237 मिलिमीटर महाबळेश्वर येथे 147 मिलीमीटर, वळवण येथे 218 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 2162 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 103.30 टीएमसी झाला आहे.