“कडकनाथ’ प्रकरणी पाटणला गुन्हा दाखल

पाटण  – पाटण तालुक्‍यातील जवळपास 180 शेतकऱ्यांनी महा रयत या कंपनीच्या कडकनाथवर भरवसा ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. कडकनाथ कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी अखेर पाटण पोलीसांत गुन्हा नोंद झाला आहे. सचिन काशिनाथ शिर्के (वय 33) रा. नेरळे, ता. पाटण यांनी रयत ऍग्रो इंडिया कंपनी विरोधात फिर्याद दिली.

तालुक्‍यातील मोरगिरी, तारळे, चाफळ, पाटण, ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागात लोकांनी गुंतवणूक करुन स्वखर्चाने कोंबडी पालनसाठी मोठी शेड्‌स उभारली होती आणि कडकनाथकडे डिपॉझिट म्हणून लाखो रुपये ठेवले होते. तर काहींनी तीन-तीन महिने कष्ट घेऊन कोंबडी पिलांचे संगोपन केले. यातून काही तरी फायदा होईल म्हणून कष्ट घेतले आणि मोठ्या वजनाच्या झालेल्या कोंबड्या कडकनाथकडे सुपूर्द केल्या.

तर अंडी देणाऱ्या कोंबड्या पालन करून त्यांच्याद्वारे उबवलेली अंडी करारानुसार कडकनाथला दिली आहेत. परंतू त्यांचे पैसे मात्र कंपनीने दिलेले नाहीत. दोनशे पक्षांचे युनिटसाठी पाटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून 75 हजार रुपये डिपॉझिट लिहून घेतले होते. कंपनीने शेतकऱ्यांना करार पद्धतीने पक्षी संगोपनासाठी दिले होते. एका युनिटसाठी 200 पक्षी कंपनीने दिले होते. यामध्ये पक्षांना लागणारे खाद्य, भांडी, डॉक्‍टर हे शेतकऱ्यांना कंपनीने पुरवण्यासाठी करार केला होता.

याबाबत तक्रारदार शेतकऱ्यांनी पाटण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची भेट घेतली व संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यात या कंपनीने अनेक जणांना गंडा घातला होता. सुमारे 1 कोटी 42 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कंपनीने 75 हजार पक्ष्यांची अंडी पहिल्यांदा पन्नास रुपये नंतर तीस रुपये व वीस रुपये दराने घ्यावयाची ठरले होते. अशी एकूण अंड्यांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना 2 लाख 30 हजार वार्षिक मिळतील, असे आमिष दाखवले होते.

मात्र कंपनीने एका अंड्याला केवळ दहा रूपये दराने खरेदी केले. करारानुसार दर न दिल्याने अंड्यांच्या खरेदीची कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कंपनीने यानंतर शेतकऱ्यांसाठी दुसरी योजना राबवणे. त्यामध्ये दहा लाख रुपये डिपॉझिट घेऊन एका युनिटसाठी 330 पक्षांच्या उत्पादित 4 हजार अंड्यांसाठी साठ रुपये दराने खरेदी करण्याची हमी दिली होती. याप्रमाणे शेतकऱ्याला दोन लाख 40 हजार रुपये दिले जातील. असे करारपत्र लिहून दिले होते. यासाठी शेतकऱ्यांकडून सुरुवातीला कंपनीने 1 लाख 33 हजार रुपये घेतले होते. एक हजार रुपयाला एक पक्षी याप्रमाणे खरेदी करू असे आश्वासन दिले होते. मात्र कंपनीने कराराप्रमाणे कोणतेही वचन पाळले नसून तालुक्‍यातील सुमारे 180 शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. अखेर पाटण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.