सातारा – सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कास परिसरात पर्यटकांना निर्जन स्थळी गाठून लूटमार करणाऱ्या सोमनाथ शिवाजी जाधव, अक्षय नाथाजी गुजर (दोघे रा. फडतरवाडी, ता. सातारा) यांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, सोमनाथ व अक्षय यांची टोळी कासला येणाऱ्या पर्यटकांना निर्जन स्थळी गाठून लूटमार करत होती. त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
या दोघांना सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल न झाल्याने तालुका पोलिसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी होऊन दोघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला. यापुढेही गुन्हे करणाऱ्यांवर तडीपारी व इतर गंभीर कारवाया करण्यात येतील, असा इशार सातपुते यांनी दिला आहे.