वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

शहरात धुळीचे लोट ः रिमझिम पावसाने नागरिक सुखावले 
पिंपरी –
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरात धुळीचे लोट व विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, शहरात अचानक आलेले धुळीचे लोट व पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
मागील तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने हैराण झाला आहे.

राज्यभरात सतत 40 अंश सेल्सिअस तापामानाहून अधिक पारा होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील उष्णतेचा पारा चाळीस अंशाच्या खाली उतरला आहे. शहरातील तापमानाची पातळी खाली उतरुनही वातावरणातील उकाडा नागरिकांना असह्य झाला होता. उष्णतेने त्रस्त झालेल्या शहरातील नागरिकांना पावसाच्या सरींनी निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा दिला. मात्र, तत्पुर्वी सुटलेलासोसाट्याचा वारा व धुळीने नागरिकांची तारांबळ उडाली.

पिंपरी-चिंचवड शहरातदोन दिवस ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरु होऊन धुळीचे लोट तयार झाले. संपूर्ण शहरात अचानक आलेल्या धुळीमुळे नागरिकही हैराण झाले होते. वाऱ्याचा वेग व विजांचा कडकडामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना दुचाकी चालविणेदेखील अवघड झाले होते. यावेळी नागरिकांनी वाहने थांबवून आडोशाला उभे राहणे पसंत केले . वादळामुळे शहरातील ठिक-ठिकाणी रस्त्यावर झाडे व फलक पडले. अचानक पाऊस सुरु झाल्याने दुकानदार, विक्रेत्यांचीही धावपळ उडाली.

चाकरमानेदेखील धुळीच्या कचाट्यात सापडले. हवामान खात्याने शुक्रवारी पावसाची शक्‍यता वर्तविली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास संपूर्ण शहरभर धुळीचे लोट जास्त व पाऊस कमी पडल्याचे चित्र दिसत होते. रात्री आठ वाजल्यानंतरही पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत होत्या. सायंकाळी सहा वाजल्यापासून अचानक जोरात वादळ वारे सुटले. वाऱ्याने जोर धरताच सगळीचे धुळीचे लोट उडू लागले होते. घरांमध्ये, दुकानांमध्ये सर्वत्र माती आणि धूळच धूळ पसरली होती. वाऱ्याचा वेग आणि त्यासोबत उडणारी माती वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.