पाच अल्पवयीन मुलींची सुटका; सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी

पुणे – प्रेम प्रकरणातून तसेच इतर कारणांनी अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. पुणे शहरात मार्च ते एप्रिल दरम्यान 223 मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. याची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून सहायक पोलीस आयुक्ताअंतर्गत एक विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोहीम राबवून सामाजिक सुरक्षा विभागाने वेगवेगळ्या प्रकरणातील 5 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या मुली परराज्यांसह पुणे जिल्ह्यातून शोधून काढण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात डिसेंबर ते मे दरम्यान 714 अल्पवयीन मिसिंगच्या तक्रारी दाखल आहेत. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्याचा तपासही अपहरणाच्या गुन्ह्यासारखाच करण्यात येतो. मात्र, तरीही बेपत्ता झालेल्या अल्पवयीन शोध गांभीर्याने घेतला जात नाही. यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष उपाययोजना राबविण्याचे हाती घेतले आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणातील 5 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला. यातील आरोपींना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मांजरी येथून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तपासामध्ये महादेव आंधळे (रा. मांजरी, मूळ वाशीम)यास माण मुळशी येथून ताब्यात घेऊन मुलीची सुटका करण्यात आली. तसेच आणखी एका मुलीची चेतन साईनाथ जाधव (वय 23, रा.हडपसर, शांतीनगर) याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2017 रोजी कोंढव्यातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. शाहरुख सादीक शेख (कोंढवा) याने फूस लावून पळवून नेले होते. तिची सुटका कर्नाटकमधील विजापूर येथून करण्यात आली. तर दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2015 मध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. तिची सुटका सोमनाथ गुलाब कुंभार(रा.आळंदी) याच्या ताब्यातून करण्यात आली. चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2018 मध्ये जनवाडी येथून एका अल्पवयीन मुलीला पळवले होते. तिची सुटका अनिकेत बबनराव गायकवाड(रा.दौंड) याच्या ताब्यातून लवासा मुळशी येथून करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.