पुणे – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील आर्थिक वर्षात रेल्वे विभागाने केलेल्या कार्याबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्राद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. “यापुढेही याच प्रेरणेने काम करत आपण सर्व विक्रम मोडीत काढू,’ असा विश्वासही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला.
रेल्वे मंत्रालयातर्फे आर्थिक वर्षाच्या अखेरीस विभागीय कार्यालयांचा वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी करोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प पडले. अशा स्थितीत रेल्वे कर्मचारी मात्र सातत्याने काम करत होते. त्यामुळेच यंदा रेल्वेच्या आर्थिक उत्पन्न आणि कार्यक्षमतेत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
या कार्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना गोयल म्हणाले, “करोना साथीच्या काळात सर्व जग थांबलेले असताना, रेल्वेने कधी एक दिवसही सुट्टी घेतली नाही आणि अर्थव्यवस्थेच्या चाकांना गतिमान ठेवण्यासाठी मोठ्या जोखमीने अधिक कठोर परिश्रम घेतले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वचनबद्धतेमुळेच देशात आवश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा करण्यात आला, मग ते वीज प्रकल्पांसाठी कोळसा असो, शेतकऱ्यांसाठी खत असो किंवा देशभरातील ग्राहकांसाठी धान्य असो. करोना विरोधातील लढाईत आपल्या निस्वार्थ योगदानास देश नेहमीच स्मरणात ठेवेल.’