ताथवडे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी (दि. २१) मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. ताथवडे येथेही सुनेत्रा पवार येणार म्हणून माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते.
सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नवले म्हणाले “यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ”. सुनेत्रा पवार यांनी मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून त्या कंप्लिमेंटचा विनम्रपणे नि:शब्दपणे स्वीकार केला.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “बाहेरची” असे संबोधून सून सुनेत्रा पवार यांना परके ठरवले होते. त्यावरून मोठी खळबळ देखील उडाली होती. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनीही नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता.
आता शाब्बास सूनबाई म्हणत सर्वात सरस सून असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे. दरम्यान, नवले यांची नातसून जान्हवी सूमेश नवले यांनी नुकतेच यूपीएससीमध्ये यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी जान्हवी यांचे कौतुक करीत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.