पुणे – पुण्याहून उत्तराखंडकडे जाणारी मानसखंड एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता रवाना झाली. तिला भारत गौरव टुरिस्ट ट्रेन असे नाव देण्यात आले आहे.
प्राचीन भारतीय धर्मग्रंथांनुसार उत्तराखंडमधील कुमाऊं प्रदेश हा मानसखंड म्हणून ओळखला जातो. उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विद्यमाने उत्तराखंडच्या कुमाऊं विभागातील कमी ज्ञात स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही विशेष पर्यटक ट्रेन सुरू केली आहे.
पर्यटकांना “आयआरसीटीसी’द्वारे उत्तराखंड पर्यटन विकास मंडळासोबत करार करत २८ हजार २० रुपयांचे पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे पॅकेज दहा रात्री ११ दिवसांचे आहे. पुण्यातून प्रस्थान करताना पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत, औक्षण करण्यात आले. ही एक्स्प्रेस २४ एप्रिल ला उत्तराखंडमधील टनकपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
त्यानंतर पर्यटकांना दाखवण्यात येणाऱ्या स्थळांमध्ये नैनिताल, भीमताल, अल्मोरा, चौकोरी, पूर्णागिरी मंदिर, हात कालिका मंदिर, कातरमाळ, कैंची धाम, चिताई गोलू देवता, जागेश्वर, शारदा घाट, पाताल भुवनेश्वर मंदिर, नानकमत्ता गुरुद्वारा, चंपावत इत्यादी विविध ठिकाणांचा समावेश आहे.
अशी आहे एक्स्प्रेस
ट्रेनचा प्रवास ३AC ट्रेनमध्ये आहे. तथापि, पर्यटकांच्या आरामात वाढ करण्यासाठी एका कूपमध्ये केवळ चार व्यक्तींचे बुकिंग करण्यात आले आहे. ट्रेनचा बाह्य भाग उत्तराखंडच्या समृद्ध नैसर्गिक, सांस्कृतिक, वास्तुशिल्प आणि आध्यात्मिक वारशाचे प्रदर्शन करतो. पॅन्ट्री कारच्या कोचमध्ये उत्तराखंडातील खास प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखायला मिळतील.
दुसऱ्या एका डब्यात विविध सणांचे चित्रण आढळते. एका डब्यात राज्यातील विविध पोशाख परिधान केलेले लोकांचे चित्रण बघायला मिळते. डब्यांवर विविध मंदिरे आणि इतर महत्त्वाची ठिकाणेही चित्रित केली आहेत.