पुणे – सीबीएससीच्या संचालकाचे राजमुद्रा असलेले बनावट पत्र देऊन एकाला तब्बल ५० लाखाचा गंडा घातला. ट्रेनींग आणि स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे टेंडर पास करुन देण्याचे आश्वासन देऊन ही रक्कम उकळण्यात आली.
याप्रकरणी चंद्रा प्रदीप बॅनर्जी (४७,रा. बाणेर) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार प्रफुल्ल पाटील (४५,रा.मोशी), राजेंद्र शर्मा (दिल्ली) आणि राकेश शर्मा (दिल्ली) यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांची ओळख आहे. यातील आरोपींनी सीबीएसीच्या संचालकांशी ओळख असल्याचे फिर्यादीला भासवले.
अभ्यासक्रम बदलल्यावर शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनींग आणि स्क्रील डेव्हलपमेंटचे टेंडर निघते. हे टेंडर पास करुन देण्याचे आमिष दाखवले. यासाठी वेळोवेळी रोख ४६ लाख आणि ऑन लाईन पध्दतीने ४ लाखाची रक्कम घेण्यात आली.
त्या बदल्यात अशोकचक्र असलेल्या मुद्रेचे लेटरहेड त्यावर सीसीएससीचे संचालक डॉ.बिस्वजीत सहा यांची डिजीटल सही असलेले पत्र आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे शिक्का असलेले टेंडर, ११ जिल्हयातील शाळांच्या नावांची यादी पाठवून दिली.
मात्र हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करत आहेत