ईडीने दाखल केली मनि लॉड्रिंगची केस
मुंबई – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर सक्त वसुली विभाग म्हणजेच ईडीने मनि लॉड्रिंगची केस दाखल केली असून त्या अनुषंगाने त्यांच्या ठिकाणांवर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात या आधीच एफआयआर दाखल केला आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यातच त्यांची ईडीने विदेशी चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा कायद्याअंतर्गत चौकशी केली होती. तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ऑगस्ट महिन्यात छापे घातले होते. गोयल यांनी या कंपनीच्या नावे तसेच स्वताच्या नावे अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या असून त्यांच्या काहीं मालमत्ता विदेशातही आहेत. कंपनीच्या नावे त्यांनी 19 मालमत्ता घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या मालमत्ता चढ्या भावात घेऊन नंतर त्यातून नुकसान झाल्याचेही त्यांनी आपल्या हिशोबात दाखवले आहे असे ईडीचे म्हणणे आहे. त्यांनी अस्तित्वातच नसलेल्या विमान कंपन्यांना त्यांची विमाने लीजवर घेतल्याचे सांगून त्याच्या भाड्यापोटी कोट्यावधी रूपयांचेही पेमेंट केल्याचे त्यांनी दाखवले असल्याचे सांगण्यात येते.