Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी मोदी (modi) सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर भाजपने जोरदार पलटवार केला. गांधी परिवारातील सदस्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्या पक्षाने बोट ठेवले. तसेच, गांधी परिवार जगातील सर्वांत भ्रष्ट परिवार असल्याचे म्हटले.
राहुल यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेतली. अदानी समुहाशी संबंधित विषय सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. मात्र, राहुल यांचा न्यायालयावर किंवा राज्यघटनेवर विश्वास नसल्याचे त्यांच्या वक्तव्यांमधून सूचित होते.
स्वत: राहुल नॅशनल हेराल्डप्रकरणी जामिनावर आहेत. ते स्वत:वरील आणि रॉबर्ट वढेरा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कधीच काही बोलत नाहीत, असे भाटिया म्हणाले.
कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच भ्रष्टाचार आहे. त्याउलट, प्रामाणिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जनतेची सेवा करत आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.