World Cup 2023 New Zealand vs Afghanistan Match Result :- विश्वचषकाच्या 16व्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करत (New Zealand) गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पटकावलं आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकांत 139 धावांवर गारद झाला.
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही विभागात अफलातून वर्चस्व राखत न्यूझीलंडने बुधवारी झालेल्या लढतीत अफगाणिस्तानचा तब्बल 149 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर येथे सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडने आपली उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची वाटचाल भक्कम केली आहे.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले व त्यांचा संपूर्ण डाव 35 व्या षटकांत 139 धावांवर संपूष्टात आला. रेहमत शाहने 36, अजमतुल्ला ओमरझाईने 27 तर, इक्रम अलीखीलने 19 धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केल्याने त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन व मिचेल सॅंटनर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. ट्रेन्ट बोल्टने 2 बळी घेतले.
Two more points on the board in Chennai! Lockie Ferguson 3-19 and Mitch Santner 3-39 leading the bowling effort. Scorecard | https://t.co/KwEW5rcWOQ #CWC23 pic.twitter.com/VLDdZqy6rh
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2023
तत्पूर्वी, विल यंग, कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलीप्स यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 289 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते.
अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मुजीब उर रेहमानने भरात असलेल्या डेव्हन कॉनवेला बाद करत सुरुवातही थाटात केली. मात्र, त्यानंतर विल यंगने राचीन रवींद्रसह जबाबदारीने परंतू आक्रमक फलंदाजी करत डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले. राचीन चांगला खेळत असताना 41 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावत 32 धावांवर परतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या डावाची थोडी घसरण झाली. अर्धशतक थाटात साकार केलेला यंग आततायी फटका मारताना 54 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार फटकावले.
त्याच्या पाठोपाठ डॅरेल मिशेलनेही निराशा केली. त्यांचा डाव अडचणीत आलेला असताना कर्णधार टॉम लॅथमने ग्लेन फिलीप्सच्या साथीत भक्कम फलंदाजी केली. त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण करताना चौथ्या गड्यासाठी 144 धावांची भागीदारी करत संघाला अडीचशे धावांची मजल मारुन दिली. त्यानंतर हे दोन्ही फलंदाज पाठोपाठ बाद झाले.
फिलीप्सने 71 धावांच्या खेळीत 80 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. लॅथमने 68 धावांची खेळी करताना 74 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार मारले. तळात मार्क चॅपमनने छोटी परंतु वेगवान खेळी करत मिचेल सॅंटनरसह संघाला 50 षटकांत 6 बाद 288 अशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. चॅपमनने 12 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 25 धावा केल्या तर, सॅंटनर 7 धावांवर नाबाद राहीला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक व अजमतुल्ला ओमरझाई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. मुजीब उर रेहमान व रशीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक :-
न्यूझीलंड – 50 षटकांत 6 बाद 288 धावा. (ग्लेन फिलीप्स 71, टॉम लॅथम 68, विल यंग 54, राचीन रवींद्र 32, डेव्हन कॉनवे 20, मार्क चॅपमन नाबाद 25, मिचेल सॅंटनर नाबाद 7, नवीन उल हक 2-48, अजमतुल्ला ओमरझाई 2-56, रशीद खान 1-43, मुजीब उर रेहमान 1-57).
अफगाणिस्तान – 34.4 षटकांत सर्वबाद 139 धावा. (रेहमत शाह 36, अजमतुल्ला ओमरझाई 27, इक्रम अलीखील 19, लॉकी फर्ग्युसन 3-19, मिचेल सॅंटनर 3-39, ट्रेन्ट बोल्ट 2-18).