‘सत्ता गेल्यानंतर भाजपाच्या आमदारांना प्रश्‍नांचा साक्षात्कार’

पाच वर्षांतील अपयश झाकण्यासाठी उठाठेव; विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांसह शास्तीकराचा प्रश्‍न सुटला म्हणून जल्लोष करून पेढे वाटणाऱ्यांनी पुन्हा हाच प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला आहे. या आमदारांनी शहराशी निगडीत एकही प्रश्‍न न सोडविता दिशाभूल केली. गेल्या पाच वर्षांत सत्ता असताना प्रश्‍न सोडवू न शकलेल्या आमदारांना हे प्रश्‍न सुटले नसल्याचा साक्षात्कार झाला असून केवळ अपयश झाकण्यासाठीच ही उठाठेव सुरू असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मंगळवारी केला.

काटे यांनी प्रश्‍नांबाबत पत्रकारांशी संवाद साधत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, मागील पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या भाऊ, दादा या दोन्ही आमदारांना शहरातील पाणी प्रश्‍न व शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सोडवता आला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 95 टक्के पाणीसाठा असताना सत्ताधारी भाजपने शहरात पाणी कपात सुरू केली.

विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने लोकांच्या मनात असंतोष आहे. हे आमदार मागील पाच वर्षात सत्तेत राहून शास्तीकराचा विषय निकालात काढता आला नाही. आता सत्ता गेली आहे. भविष्यात महापालिकेची सत्ता जाणार याचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी हे प्रश्‍न उपस्थित करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न चालविल्याचेही काटे म्हणाले.

शहरातील अधिकृत बांधकामासह शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लागत नाही म्हणून 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांना मागील पाच वर्षांत शहरातील शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लावण्यात काही अंशी यश आले असले तरी हा प्रश्‍न ते सोडवू न शकल्यामुळे स्वत:चे अपयश लपविण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.

आमदारांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अपयशाची कबुलीच दिली आहे. 1000 चौरस फुटापर्यंत निवासी बांधकाम असलेल्या नागरिकांना जिझिया करात सूट देण्यात आली असल्याचे सरकारने वेळोवेळी घोषित केले. त्यावेळी स्थानिक भाजपच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे ही भरवले होते, याची आठवणही काटे यांनी करून दिली.

सत्ताधाऱ्यांमुळे शहरात पाणीटंचाई
शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले असतानाही 25 नोव्हेंबर पासूनच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. आजही शहरात अनेक ठिकाणी दूषित व व विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मार्गी लागत नाहीत. तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणीकपात करावी लागते, असे भाजपच्या दोन्ही आमदार सांगतात. आता स्वत:चे अपयश झाकण्यासाठी नागपुरातील अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची वेळ या आमदारांवर आल्याचेही काटे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.