मोकाट कुत्री ‘त्या’ लाल बाटल्यांना घाबरत नाहीत

पिंपरी – पूर्वी घराच्या प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुस्वागतम्‌ अशी पाटी असायची. कालांतरांने ती पाटी गेली आणि तिथे कुत्र्यापासून सावधान नावाच्या पाटीने जागा घेतली. ही देखील पाटी कालांतराने मागे पडली आणि आता दारोदारी लाल रंगाच्या बाटलीने जागा घेतली. घराच्या अंगणात कुत्रा येऊ नये, त्याने तिथे काही घाण करू नये म्हणून आजकाल आलेली ही नवीन फॅशन.

महापालिका भटक्‍या कुत्र्यांवर उपाययोजना करत नाही म्हटल्यावर नागरिकांनीच हा जालीम उपाय शोधून काढला. शहरात ही प्रथा झपाट्याने पोहचली आणि प्रत्येक घराच्या समोर लाल रंगाच्या बाटलीने जागा मिळविली. मोकाट कुत्री अशा बाटल्यांना बिल्कुल घाबरत नाहीत आणि मुळातच कुत्र्यांना लाल रंग ओळखता येत नाही, त्यामुळे या बाटल्या म्हणजे वेळ वायाला घालविण्याचे आणि अंधश्रद्धा वाढविण्याचे द्योतकच आहे.

महापालिका प्रशासनाची अनास्था : गैरसमज असल्याचा तज्ज्ञांचा दावा
घराच्या सभोवताली लहान मुले खेळत असतात. मोकाट कुत्र्यांपासून त्यांचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. तसेच ही कुत्री घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण करून ठेवतात. शहरातील भोसरी, मोशी, पिंपरी, चिंचवड, येथील बहुतांश हाऊसिंग सोसायटीच्या आवारात या लाल रंगाच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. उच्चभ्रू नागरिकांचा परिसर म्हणून ओळख असलेल्या पिंपळे गुरव, नवी सांगवी, वाकड, परिसरातही दारोदार या बाटल्या दिसतात. एवढेच नव्हे तर नवी सांगवीत काही शाळांच्यासमोर ही लाल रंगाच्या बाटल्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

नागरिकांच्या मनात भीती
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोकाट, भटक्‍या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरात सुमारे 70 हजार भटकी कुत्री आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये कुत्र्यांनी सुमारे 80 हजार नागरिकांना चावा घेतला आहे. हे आकडे आणि रात्री-अपरात्री मागे धावणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या स्वाभविकपणे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. महापालिका प्रशासन आपला ढिम्मपणा सोडण्यास तयार नसल्याने नागरिक कुंकू किंवा होळीचा रंग मिसळून लाल बाटल्या ठेवत आहेत.

त्यांच्यासाठी लाल आणि राखाडी रंग सारखाच
कुत्र्यांबाबत झालेला अभ्यास असे सांगतो, की कुत्र्यांना लाल रंग ओळखताच येत नाही. म्हणजे, माणसांना लाल रंग जसा दिसतो, तसा तो कुत्र्यांना दिसत नाही. माणसांना जे आणि जसे सात रंग दिसतात, त्यापैकी कुत्र्यांना प्रामुख्याने पिवळा, निळा आणि राखाडी हेच रंग दिसतात. कुत्र्यांना लाल रंगाऐवजी गडद राखाडी रंग दिसतो, असे परदेशात झालेल्या प्रयोगांचे निष्कर्ष आहेत.

सोशल मीडियात ‘दे दणा दण 2’ची चर्चा
काही दिवसांपूर्वी दे दणा दण नावाचा एक चित्रपट आला होता. यामध्ये नायकाला देवाने एक शक्ती बहाल केली होती. मात्र लाल रंग बघितला की त्या नायकाच्या शरिरातून ती शक्ती निघून जायची. आता कुत्र्यांना लाल रंगाची भीती दाखवून दे दणा दण 2 येणार का अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

कुत्र्यांना लाल रंगाची भीती असते हा गैरसमज आहे. समजा कुत्रा लाल रंगाला घाबरत असता तर लाल रंगाच्या वाहनाच्या पाठीमागे लागला नसता. त्यामुळे कुत्रा घराच्या परिसरात येऊ नये म्हणून लाल रंगाची बाटली दारात ठेवणे केवळ अंधश्रद्धा आहे.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.