नवी दिल्ली – बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणजेच, अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या मुलाच्या नावाबाबत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या इयत्ता सहावीच्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत करीना-सैफ यांचा मुलगा ‘तैमूर’ याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे संपतापलेल्या पालकांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे या शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमका कोणता प्रश्न विचारण्यात आला होता…
विद्यार्थ्यांना ‘करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचं पूर्ण नाव’ लिहिण्यास सांगितलं होत. आणि याच प्रश्नावरून हे प्रकरण सुरु झालं आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची दखल घेत खांडवा जिल्हा शिक्षणाधिकारी संजीव भालेराव यांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच, विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारण्याऐवजी ‘जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई’ यांबाबत प्रश्न शाळेनं प्रश्नपत्रिकेत विचारायला हवे होते. असं मत पालकांनी व्यक्त केलं आहे.