अहमदनगर – महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात करोनाचा स्फोट झाला आहे. शुक्रवारी शाळेतील 19 विद्यार्थ्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. येथील निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा एक भाग आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात ही शाळा असून येथील विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या निवासी शाळेत इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत एकूण 400 हून अधिक विद्यार्थी आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांत एकोणीस विद्यार्थ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व विद्यार्थांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेकांना कोणतीही लक्षणे नाहीत तर काहींना किरकोळ लक्षणे आहेत. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शाळेतील उर्वरित विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी तसेच अभ्यागतांची आरटी-पीसीआर चाचणी घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोना विषाणूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.