सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या चार वर्षात बॅंक व सभासदांचे हित साधण्याऐवजी नैतिक जबाबदारी टाळून केवळ त्यांच्या स्वार्थी “मास्टर माईंड’च्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, या चुकीच्या धोरणामुळे बॅंकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सत्ताधाऱ्यांनी बॅंकेचा राजकीय अड्डा करून ठेवला असून या निवडणुकीत स्वार्थी “मास्टर माईंड’ला घरी बसवा, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.
खटाव तालुक्यातील मोळ व पुसेगाव येथे सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचार प्रारंभ व निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. शिंदे बोलत होते. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, समितीचे कोषाध्यक्ष विठ्ठल फडतरे, उमेदवार नवनाथ जाधव, आबासो जाधव, ज्येष्ठ सभासद मु. का. खराटे, तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, दिलीप पवार, काळंगे गुरुजी, हणमंतराव घनवट, बाळकृष्ण जगताप, नारायण घनवट, शिवनाथ लखापते, विजय गोरे, नितीन खोत, विजय गुरव उपस्थित होते. उदय शिंदे म्हणाले, “”कै. काळंगे गुरुजींच्या पुरोगामी विचाराने शिक्षक समितीने नेहमी सकारात्मक समाजकारण व राजकारण केले आहे. गेल्या निवडणुकीत काळंगे गुरुजींच्या खटाव मतदारसंघातील बालेकिल्ल्यात चुकीची व्यक्ती निवडून आली होती.
झालेली चूक सुधारून नवनाथ जाधव व आबासो जाधव यांच्यासारख्या होतकरू व समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी द्यावी.” ज्येष्ठ नेते रामचंद्र चव्हाण म्हणाले, “प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी 4 वर्षात एकही सभासदहिताचे काम केले नाही.
याउलट त्यांनी सत्तेचा गैरवापर करीत भ्रष्टाचाराचा कळस गाठला. ही निवडणूक आता सभासदांनी हातात घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधऱ्यांचा ऐतिहासिक पराभव होणार आहे.’ विश्वंभर रणनवरे म्हणाले, “गेल्या 4 वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या तावडीतून शिक्षकांची बॅंक वाचावी म्हणूनच समविचारी संघटना एकत्रित आल्या आहेत. सभासद परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी भरघोस मतांनी विजयी करावे.’ नवनाथ जाधव व आबासो जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोरख पवार, दशरथ घनवट, जोतीराम घनवट, संजय दिडके, अरुण आवळे, विनोद गोडसे, कृष्णात गिरी, उमेश पाटील, शामराव कदम, र. मु. चव्हाण, अमोल ढगे, नितीन घनवट, जयश्री गोडसे, शशिकला करणे, संगिता शिंदे, रेखा कोरडे, कीर्ती माने, रत्नमाला मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विठ्ठल फडतरे यांनी केले. दीपक घनवट यांनी आभार मानले.
बंडोबा शिंदेंची कारकीर्द काळी कुट्ट
खटाव मतदारसंघातील ज्या नेतेमंडळी, कार्यकर्ते व सभासदांनी संघटना म्हणून बंडोबा शिंदे यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांनाच जाणीवपूर्वक डावलण्याचे पाप सर्वप्रथम त्यांनी केले. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीत शिंदेंना एकही ठोस काम करता आले नाही. मतदारांशी त्यांनी कसलाही संपर्क ठेवला नाही. त्यांची संचालकपदाची कारकीर्द काळी कुट्ट आहे. खटाव मतदारसंघात शिक्षक संघाला सक्षम उमेदवार सापडत नाही. या दयनीय अवस्थेस विद्यमान संचालक बंडोबा शिंदे व सोबतची चांडाळ चौकडी जबाबदार आहे, असे मत सभासद परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ नेते अंकुशराव शिंदे यांनी व्यक्त केले.