चंदीगड – पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. ‘आप’ला येथे दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत जीवनज्योत कौर यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांचा पराभव केला आहे.
पॅड वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीवन ज्योत कौर कोण आहेत?
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जीवनज्योत कौर यांना ‘पॅड वुमन’ म्हणून ओळखले जाते. जीवन ज्योत यांनी पंजाबमधील कारागृहातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन पुरवले. तसेच गरीब महिलांना प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूक केले आहे. त्यामुळे त्यांना येथे पॅड वुमन म्हणून ओळखतात.
शी समाजाच्या संस्थापक आहेत जीवन ज्योत कौर
जीवनज्योत कौर या शी समाजाच्या संस्थापक असून त्यांची संस्था समाजातील गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यांनी एका परदेशी कंपनीशीही करार केला आहे, जी ग्रामीण महिलांना पुन्हा वापरता येणारे सॅनिटरी पॅड मोफत पुरवते.
जीनज्योत कौर यांची मुलगी दंतचिकित्सक असून मुलगा उच्च न्यायालयात वकील आहे. निवडणूकीदरम्यान त्यांची मुलगी आणि मुलानेही प्रचार केला. याशिवाय त्यांचे आई-वडील, पती, सासू-सासरेही जीवनज्योतसाठी मैदानात उतरले होते.