चंदीगड – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झंझावाताने सर्वांची तारांबळ उडाली आहे. येथे दिग्गजांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आम आदमी पक्षाच्या लाटेने सर्व समीकरणे उद्ध्वस्त केली आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांना आपली जागा वाचवता आली नसून मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना पक्षाने विधानसभेच्या दोन जागांवर निवडणूक उमेदवारी दिली होती. मात्र दोन्ही जागांवर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पक्षाने त्यांना सामान्य माणूस आणि दलित चेहरा म्हणून पुढं केलं. मात्र पक्षाचा हा डावही फसला.
बर्नाला येथील राखीव भदौड जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, कारण मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी येथून निवडणूक लढवली पण त्यांना विजय मिळवता आला नाही. आम आदमी पक्षाने लाभ सिंह यांना त्यांच्यासमोर उभे केले.
साध्या कुटुंबातून आलेले आणि व्यवसायाने मोबाईल रिपेअर करणारे लाभ सिंह यांनी चन्नी यांचा पराभव केला आहे. तर श्री चमकोर साहिब मतदार संघात चन्नी यांना डॉ. चरणजीत सिंह यांनी धूळ चारली.