Yashasvi Jaiswal Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात द्विशतक झळकावले. यादरम्यान यशस्वीने षटकारांचा वर्षाव केला. यशस्वीने आपल्या खेळीदरम्यान अनेक विक्रम मोडीत काढले.
भारताकडून कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला. या प्रकरणात त्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूचा विक्रम मोडला. यशस्वीने दुसऱ्या डावात नाबाद 214 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 12 षटकार मारले. यासह पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यात यशस्वीच्या नावावर आता 22 षटकार झाले आहेत. याशिवाय कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा यशस्वी जैस्वाल हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने आपला कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला. तसेच कसोटीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा वसिम अक्रमच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली.
वसीम अक्रमच्या विक्रमाची केली बरोबरी…
यशस्वी जैस्वालने आपल्या डावात 12 षटकार ठोकले. कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला. त्याने वसीम अक्रमच्या 28 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. अक्रमने 1996 मध्ये शेखूपुरा (पाकिस्तान) येथे झिम्बाब्वेविरुद्ध 12 षटकार ठोकले होते. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, न्यूझीलंडचा नॅथन ॲस्टल, ब्रेंडन मॅक्युलम (दोनदा), इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि श्रीलंकेचा कुसल मेंडिस यांनी एका डावात प्रत्येकी 11 षटकार ठोकले आहेत.
कसोटीच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार
2024 – यशस्वी जयस्वाल वि. इंग्लंड 12
1996 – वसिम अक्रम वि, झिम्बाब्वे 12
2003 – मॅथ्यू हेडन वि. झिम्बाब्वे 11
2002 – नॅथन अस्टल वि. इंग्लंड 11
2014 – ब्रॅंडन मॅक्युलम वि. पाकिस्तान 11
2014 – ब्रँडन मॅक्युलम वि. श्रीलंका 11
2016 – बेन स्टोक्स वि. दक्षिण आफ्रिका 11
2023 – कुशल मेंडीस वि. आयर्लंड 11
IND vs ENG 3rd Test : ‘सर जडेजा’समोर ‘बेझबॉल’ रणनिती फेल, भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय…
रोहित शर्माचा चार वर्ष जुना विक्रम मोडला
यशस्वीने मालिकेतील 20 वा षटकार मारून रोहित शर्माचा चार वर्ष जुना विक्रम मोडला. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 19 षटकार मारले होते. आता यशस्वी त्याच्या पुढे गेला आहे. कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा तो खेळाडू ठरला. हरभजन सिंग तिसऱ्या तर नवज्योत सिंग सिद्धू चौथ्या स्थानावर आहे. हरभजनने 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 14 षटकार तर सिद्धूने 1994 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 11 षटकार मारले होते.
सिद्धूचा 30 वर्ष जुना विक्रमही मोडला
राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात नववा षटकार लगावत यशस्वीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारतासाठी कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो खेळाडू ठरला. याबाबतीत तो सिद्धूच्या पुढे गेला. सिद्धूने 1994 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आठ षटकार मारले होते. मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध एका डावात आठ षटकार मारले होते.
Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?
एका षटकात तीन षटकार मारणारा पाचवा फंलदाज…
भारताच्या दुसऱ्या डावातील 85 व्या षटकात यशस्वीने तुफानी फलंदाजी केली. त्याने इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. 2002 नंतर कसोटीत एका षटकात तीन षटकार मारणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
महेंद्रसिंग धोनीने दोनदा अशी कामगिरी केली आहे. 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध डेव्ह मोहम्मदच्या गोलंदाजीवर त्याने तीन षटकार मारले होते. मोहम्मद रफिकच्या चेंडूवर त्याने 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये हार्दिक पांड्याने श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमाराच्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार मारले होते. रोहित शर्माने विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेन पीटवर तीन षटकार ठोकले. त्याचवेळी उमेश यादवने 2019 मध्ये रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज जॉर्ज लिंडेच्या चेंडूवर तीन षटकार मारले होते.