चंडीगढ: करोनाचा फैलाव रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी पंजाब सरकारने घेतला. तसे पाऊल उचलणारे पंजाब हे ओडिशानंतरचे दुसरे राज्य बनले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
मागील काही दिवसांत पंजाबमधील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. त्या राज्यात 132 रूग्णांना करोना संसर्ग झाला आहे. त्यातील 11 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. ती बाब ध्यानात घेऊन पंजाबमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. इतर अनेक राज्यांकडूनही लॉकडाऊन वाढवण्याला अनुकूलता दर्शवण्यात आली आहे. सध्याची स्थिती पाहून केंद्र सरकारकडूनही लॉकडाऊन लांबणार असल्याचे संकेत याआधीच देण्यात आले आहेत.