नवी दिल्ली : चकमकीत ठार झालेल्या जैश ए महंमद दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला लॉकडाऊनचे नियम मोडून उपस्थित राहिल्याबद्दल दहा जणांना जम्मू काश्मिर पोलिसांनी शुक्रवारी
अटक केली. दरम्यान, गेल्या 24 तासांत काश्मिर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर तीन जवान शहीद होते.
सपोरे येथे जैशचा दहशतवादी साजद नवाब डर याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली. लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून सुमारे 100 जण सपोरे येथे अंत्यसंस्कारासाठी जमले. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम तोडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.
सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यापुर्वी त्याच्या कुटुंबियांकडून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची हमी लिहून घेतली होती. मात्र प्रत्यक्षात अंत्यसंस्कारास मोठ्या प्रमाणात जमाव उपस्थित राहीला. त्यामुळे दहा जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.